केकेआरचा मुंबईला दे धक्का

प्ले ऑफसाठी केकेआर-पंजाबमध्ये चुरस : मुंबईच्या पदरी आणखी एक पराभव : मनीष पांडे सामनावीर
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. मुंबईने विजयासाठी दिलेले 148 धावांचे लक्ष्य केकेआरने 19 व्या षटकात पार केले. हे लक्ष्य त्यांनी 13.3 षटकांत पार केले असते तर ते नेट रन रेटमध्ये पंजाब किंग्सला मागे टाकू शकले असते. पण, तसे न झाल्याने आता त्यांना प्ले ऑफसाठी मुंबई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या मदतीची गरज लागणार आहे. केकेआरने 13 सामन्यांत 13 गुणांची कमाई केली आहे. मुंबईचा हा 13 सामन्यांतील नववा पराभव ठरला तर केकेआरचा गेल्या आठ सामन्यांतील सातवा विजय आहे.
बुधवारी ईडन गार्डन्सवर, कोलकाताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामन्यात एक तासाचा व्यत्यय आला. प्रथम फलंदाजी करताना, फलंदाजीस कठीण असणाऱ्या खेळपट्टीवर मुंबईने निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 147 धावा उभारल्या. संघाची धावसंख्या केवळ 84 असतानाच त्यांनी 5 गडी गमावले होते. कर्णधार हार्दिक पांड्याने 26 धावा काढून डावाला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सुनील नरेनने त्याला त्रिफळाचीत केले. अखेरच्या षटकांमध्ये, कॉर्बिन बॉशने 18 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 32 धावांची खेळी केली, ज्यामुळे मुंबईला एक सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. दिग्गज फलंदाज रोहित शर्माला केवळ 15 धावा करता आल्या तर सूर्याही 15 धावा करुन माघारी परतला.
मुंबईने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने फिन अॅलनला क्लीन बोल्ड करत मुंबईला विकेट मिळवून दिली. अंगक्रिश रघुवंशीला दुखापत झाल्याने तो पहिल्या डावात मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे मनिष पांडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 33 चेंडूत 6 चौकारासह 45 धावांचे योगदान दिले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना बुमराहने त्याला बाद केले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे 21 धावा करत बाद झाला. तर कॅमेरून ग्रीन 4 धावांवर माघारी परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 40 धावा फटकावल्या. गझनफरने त्याला बाद केले. अखेरीस रिंकू सिंगने चौकार मारत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 8 बाद 147 (रिकल्टन 6, रोहित शर्मा 15, सूर्यकुमार यादव 15, तिलक वर्मा 20, हार्दिक पंड्या 26, विल जॅक्स 14, कॉर्बिन बॉश नाबाद 32, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी आणि कॅमरुन ग्रीन प्रत्येकी 2 बळी)
केकेआर 18.5 षटकांत 6 बाद 148 (अजिंक्य रहाणे 21, मनीष पांडे 45, रोव्हमन पॉवेल 40, दाहिया 11, बॉश 3 बळी, बुमराहृ, दीपक चहर आणि गझनफरन प्रत्येकी 1 बळी).
प्लेऑफसाठी चुरस
केकेआरला प्ले ऑफच्या शर्यतीत नेट रन रेटच्या बाबतीतही पंजाब किंग्सच्या पुढे जाण्यासाठी हा सामना 13.3 षटकांत जिंकणे आवश्यक होता. पंजाब किंग्सला (0.227) नेट रन रेटमध्ये मागे टाकण्यासाठी केकेआरला केवळ विजय पुरेसा नव्हता. या सामन्यातपूर्वी कोलाकाताचा नेट रन रेट हा -0.038 असा होता. पण, केकेआरने ही संधी गमावली आणि त्यामुळे त्यांना आता मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्सवर अवलंबून रहावे लागणार आहे.
Source link



