बळ्ळारी नाल्यासाठी उपाययोजना करा

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : 600 एकर सुपीक जमीन धोक्यात
बेळगाव : बळ्ळारी नाला हा लांबीने मोठा असून शहर परिसरातील अतिरिक्त पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेणारा प्रमुख जलमार्ग मानला जातो. या नाल्याच्या आजूबाजूला जवळपास 600 एकर सुपीक शेती असून, येथे पारंपरिक पद्धतीने भात, ज्वारी, गहू तसेच विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. विशेषत: बासमती भात उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो होऊन पाणी शेतीशिवारात शिरते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, बळ्ळारी नाल्याचा फटका वडगाव व येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची खोली कमी झाली आहे. त्याचबरोबर नाल्यात जलपर्णी आणि तणाची दाट वाढ झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित होत आहे. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी दोन्ही काठांवरून ओसंडून वाहून लगतच्या शेतांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. दरवषी पावसाळ्यात दीर्घकाळ शेतजमीन पाण्याखाली राहत असल्याने शेती करणे अशक्मय बनते.
त्यामुळे शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. याशिवाय नाल्यातून ओसंडून वाहणारे सांडपाणी शेतजमिनीमध्ये मिसळत असल्याने मातीचे प्रदूषण वाढत आहे. यामुळे पशुधन व नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची भीती आहे. दूषित पाण्यामुळे भविष्यात विविध रोग पसरण्याची शक्मयता नाकारता येत नाही. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन बळ्ळारी नाल्यातील गाळ तात्काळ काढून त्याची खोली आणि प्रवाह क्षमता पूर्ववत करावी. तसेच नाल्याची उंची वाढवून भविष्यात पूरस्थिती व गाळ साचण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी नाल्याचे काँक्रीटीकरण किंवा मजबूत अस्तरीकरण करावे.
यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची गंभीरता जाणून घ्यावी. वेळेत उपाययोजना झाल्यास सुपीक जमिनीचे नुकसान टळणार असून प्रदूषण कमी होणार आहे. तसेच शेकडो शेतकऱ्यांना पुन्हा उत्पादनक्षम शेती करणे शक्मय होणार असून प्रशासनाने तात्काळा याबाबत पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अमोल देसाई, नामदेव पाटील, शटूप्पा बेळगावकर, जयराज हलगेकर, राजू बिर्जे, गणपत बैलूरकर, देविदास खन्नूकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, मंगेश नागोजीचे, रामचंद्र पाटील, उमेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Source link



