गुजरातचा पंजाबवर रोमांचक विजय

साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी : वॉशिंग्टन सुंदर ठरला हिरो : गुणतालिकेत गुजरात पाचव्या स्थानी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर 4 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह आता गुजरात टायटन्सचे 12 गुण झाले आहेत. 13 गुणांसह पंजाब किंग्सचा संघ अजूनही गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 164 धावांचे आव्हान दिले होते, गुजरातने हे आव्हान 19.5 षटकात गाठताना शानदार विजय मिळवला. 24 धावांत 4 बळी मिळवणाऱ्या जेसन होल्डरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, गुजरातने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले. मोहम्मद सिराजने दणक्यात सुरूवात करताना पहिल्याच षटकात प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोलीला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर प्रभसिमरन सिंग 15 तर कर्णधार श्रेयस अय्यर 19 धावा करत बाद झाले. तर नेहाल वधेरा शून्यावर बाद झाला. 47 धावांवर 5 विकेट्स अशी अवस्था असताना मुंबईकर सूर्यांश शेडगे फलंदाजीला आला आणि त्याने संघाला संकटातून बाहेर काढले. सूर्यांशने 29 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांसह 57 धावा केल्या. तर मार्कस स्टोइनिसने 30 आणि मार्को यान्सेनने 20 धावा केल्या. या जोरावर पंजाब संघाने 20 षटकांत 9 बाद 163 धावा केल्या.
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्याच षटकात पंजाबच्या अर्शदीप सिंगने कर्णधार शुभमन गिलला अवघ्या 5 धावांवर बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. सुरुवातीचा धक्का बसल्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी डाव सावरला. या जोडीने दुस्रया विकेटसाठी 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, ही जोडी धोकादायक ठरत असतानाच विजयकुमार विशाकने बटलरला (26 धावा) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात आलेल्या निशांत संधूकडून अपेक्षा होत्या, पण मार्कस स्टोइनिसने त्याला 15 धावांवर बाद केले. एका बाजूने खिंड लढवणाऱ्या साई सुदर्शनने 41 चेंडूत 57 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मोक्याच्या क्षणी 23 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणजे, हा सामना शेवटच्या षटकांतील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला, पण वॉशिंग्टनने शानदार खेळ साकारत अखेर संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 9 बाद 163 (प्रियांश आर्या 2, प्रभसिमरन सिंग 15, श्रेयस अय्यर 19, सूर्यांश शेडगे 57, मार्क स्टोइनिस 40, यान्सेन 20, जेसन होल्डर 4 बळी, मोहम्मद सिराज आणि रबाडा प्रत्येकी 2 बळी)
गुजरात टायटन्स 19.5 षटकांत 6 बाद 167 (साई सुदर्शन 57, जोस बटलर 26, निशांत सिंधू 15, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 40, अर्शदीप सिंग आणि विजयकुमार प्रत्येकी 2 बळी, यान्सेन आणि स्टोइनिस प्रत्येकी 1 बळी)
Source link



