Uncategorized

गुजरात टायटन्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा संघ 155 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचे 156 धावांचे आव्हान सहज पेलले. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच या शानदार विजयासह प्लेऑफच्या शर्यतीत देखील जोरदार एंट्री केली आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर जेकब बेथेल 5 धावा करुन बाद झाला. आक्रमक खेळणाऱ्या विराट कोहलीने 13 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या, पण रबाडाने त्याला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. विराट बाद झाल्यानंतर आरसीबीच्या इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कर्णधार रजत पाटीदार (19) आणि टिम डेव्हिड (9) यांना रशीद खानने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर जितेश शर्मा (1) आणि कृणाल पांड्या (4) हे देखील फलंदाजीत अपयशी ठरले. एका बाजूने देवदत्त पडिक्कलने 24 चेंडूंत 40 धावांची झुंजार खेळी केली, मात्र रशीद खानने त्याला बाद करत आरसीबीच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. शेवटच्या षटकांत रोमारियो शेफर्डने 17 आणि भुवनेश्वर कुमारने नाबाद 15 धावांचे योगदान दिले, तर व्यंकटेश अय्यरने 12 धावा केल्या. तळाचा फलंदाज हेझलवूड बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव 19.2 षटकांत 155 धावांवर आटोपला.

गिल-बटलरची फटकेबाजी

आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली.

गिलने वेगवान सुरुवात केली, पण त्यानंतर भुवनेश्वर कुमारने 42 धावांवर गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने साई सुदर्शनला बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने कर्णधार शुभमन गिलच्या रूपाने गुजरातला दुसरा धक्का दिला. गिल 18 चेंडूंमध्ये 43 धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर बटलरने फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारासह 39 धावांची खेळी साकारली. पण तोही भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रोमॅरिओ शेफर्डने एकाच षटकात गुजरात टायटन्सला दोन धक्के दिले. त्याने प्रथम शाहरुख खानला बाद केले. शाहरुख 8 चेंडूंमध्ये 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याने तिसऱ्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला 12 धावांवर बाद केले. यावेळी गुजरातचा निम्मा संघ तंबूत परतला होता. पण राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर यांनी संघाला विजय मिळवून दिला. तेवतियाने 4 चौकारासह नाबाद 27 धावा फटकावल्या तर होल्डरने 12 धावांचे योगदान दिले. या जोरावर गुजरातने 15.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले.

 

 

 

संक्षिप्त धावफलक

आरसीबी 19.2 षटकांत सर्वबाद 155 (विराट कोहली 28, पडिक्कल 40, रजत पाटीदार 19, शेफर्ड 17, वेंकटेश अय्यर 12, भुवनेश्वर कुमार नाबाद 15, अर्शद खान 3 बळी, रशीद खान आणि जेसन होल्डर प्रत्येकी 2 बळी)

गुजरात टायटन्स 15.5 षटकांत 6 बाद 158 (शुभमन गिल 43, जोस बटलर 39, तेवतिया नाबाद 27, भुवनेश्वर कुमार 3 बळी, राहुल तेवतिया 2 बळी).

गुजरातची प्ले ऑफच्या शर्यतीत एंट्री

सध्या आयपीएल गुणतालिकेत गुजरातचा संघ 9 सामन्यात 10 गुणाची कमाई करत पाचव्या स्थानावर आहे. अद्याप त्यांचे पाच सामने बाकी असून चार सामन्यात विजय मिळवत ते प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकतात. विशेष म्हणजे, आरसीबीवरील विजयानंतर मात्र प्लेऑफसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

-पाचव्या विजयासह गुजरात टायटन्स प्लेऑफच्या शर्यतीत

-गिल-बटलर यांच्या भागीदारीने गुजरातचा विजय सोपा

-आक्रमक फलंदाजीचे धोरण नडल्याने आरसीबीला पुरेशा धावा जमविता आल्या नाहीत.

-रशिद खानचा किफायतशीर मारा व त्याने मिळविलेला पडिक्कलचा महत्त्वाचा बळी गुजरातसाठी मोलाची ठरली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​