Uncategorized

बालेकिल्ल्यातच मुंबईने उडवला गुजरातचा धुव्वा

99 धावांनी दणदणीत विजय : सामनावीर तिलक वर्माचे नाबाद शतक : अश्वनी कुमारचे 4 बळी

 वृत्तसंस्था/ अहमदाबाद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 99 धावांनी मोठा पराभव केला. या विजयासह मुंबईने स्पर्धेतील आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तिलक वर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 199 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमारच्या धारदार स्पेलसमोर गुजरातचा एक पण फलंदाज तग धरू शकला नाही आणि गुजरातचा संपूर्ण संघ अवघ्या 100 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे, सलग चार पराभवानंतर मुंबईला विजय गवसला आहे. 45 चेंडूत नाबाद 101 धावा फटकावणाऱ्या तिलक वर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सची फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली आणि दानिश 10 धावांवर बाद झाला. यानंतर स्टार फलंदाज डी कॉक बाद झाला. त्याला 13 धावांवर रबाडाने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव देखील 10 चेंडूंमध्ये 15 धावा करुन माघारी परतला.

तिलक वर्माचे कारकिर्दीतील पहिले शतक

सूर्या बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. सुरुवातीला त्याने आपला जम बसवला आणि त्यानंतर त्याने धुमाकूळ घालत पुढच्याच 23 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या. एकवेळी संघाने 14 षटकांत 103 धावा केल्या होत्या, पण तिलक वर्माच्या वादळी खेळीमुळे मुंबईने शेवटच्या सहा षटकांत 98 धावा झोडपल्या. तिलकने शानदार शतकी खेळी साकारताना 45 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 101 धावांचे योगदान दिले. त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले.

त्याला नमन धीरने 45 धावा करत चांगली साथ दिली. नमन बाद झाल्यानंतर  कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यातही अपयशी ठरला. त्याने 16 चेंडू वाया घालवले आणि केवळ 15 धावाच करू शकला. तिलकच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 5 बाद 199 धावा केल्या.

अश्वनी कुमारची भेदक गोलंदाजी

200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातच खराब झाली. जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद केले. सुदर्शनला आपले खाते उघडता आले नाही. यानंतर, जोस बटलर (5), शुभमन गिल (14), वॉशिंग्टन सुंदर (26) आणि ग्लेन फिलिप्स (6) हे स्टार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यावेळी गुजरातची 5 बाद 55 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर अश्विनी कुमारने राहुल तेवतियाला 8 धावांवर बाद करून गुजरातला सहावा धक्का दिला. मग, 13 व्या षटकात अश्विनी कुमारने रशीद खान (4) आणि शाहरुख खान (17) यांना बाद करून गुजरातचे कंबरडे मोडले. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 26 धावांचे योगदान दिले तर शाहरुख खानने 17 व रबाडाने 12 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्याने गुजरातचा डाव 15.5 षटकांत 100 धावांत आटोपला.

मुंबईची सातव्या स्थानी झेप

गुजरातवरील दणदणीत विजयानंतर मुंबईने 6 सामन्यांत 4 गुणांसह थेट 10 व्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर उडी मारली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवाचा मोठा फटका बसला असून त्यांचे 6 सामन्यांत 6 गुण कायम आहेत. गुजरातचा संघ सहाव्या स्थानी कायम आहे.

-सलग चार पराभवानंतर मुंबईचा पहिला व एकूण दुसरा विजय

-आयपीएलच्या या मोसमात बुमराहने मिळविला पहिला बळी

-मुंबईच्या अश्वनी कुमारचे लक्षवेधी प्रदर्शन

-मुंबई इंडियन्सची सातव्या स्थानावर झेप.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​