Uncategorized

‘Dhondgans’ (devotees) of Goddess Lairai to observe a rigorous vow starting from the 17th.

राज्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून ख्याती : धोंडगण प्रत्यक्ष जत्रेच्या दिवशी शिरगावात करतात प्रवेश

पणजी : हिंदू नववर्षातील पहिला आणि राज्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून ख्याती असलेला शिरगांव येथील श्रीदेवी लईराई मातेचा जत्रोत्सव येत्या दि. 21 रोजी होणार आहे. जत्रोत्सवात देवीसोबत अग्नीदिव्य करणारे हजारोंच्या संख्येने धोंडगण हे या जत्रेचे वैशिष्ट्या. त्यासाठी त्यांना कठोर व्रताचरण करावे लागते. त्या व्रताला येत्या दि. 17 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण राज्यभरात आणि शेजारील महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधूनही देवीचे हजारोंच्या संख्येने भक्त उपासक धोंडव्रत आचरत असतात. वैशाख शु. पंचमीला देवी लईराईचा जत्रोत्सव असला तरी गुढीपाडव्यापासूनच धोंडगणांचे सोवळे शाकाहार आचरण प्रारंभ होत असते. त्यानंतर वैशाख अमावश्येपासून ते व्रत अधिक कठोर बनते व अग्नीदिव्य केल्यानंतरच त्याची समाप्ती होते.

या पाच दिवसात बहुतेक धोंडगण घरापासून दूर एखाद्या खुल्या स्वच्छ माळरानात किंवा शेतजमिनीत मांडव वगैरे बांधून किंवा मंदिरांमध्ये गटागटांनी निवास करतात. या काळात प्रत्येक वेळी स्नानादी शुद्धकार कऊनच त्यांचे खानपान होत असते. हे खानपान म्हणजे प्रामुख्याने फलाहार किंवा मुगांचे कण्ण, गोडशे आणि नारळाचे पाणी असाच आहार असतो. दरवर्षी किमान हजारभर नवीन धोंडांची भर पडत असते. या नव्या धोंडगणांना ज्येष्ठ अनुभवी धोंडगण मार्गदर्शन, पावित्र्य, स्वच्छता, याबद्दल मार्गदर्शन करतात. या निवासाच्या काळात आहारानंतर देवीची भजने, आरती, प्रवचने, कीर्तने, स्तुतीगायने आदी कार्यक्रम होत असतात.

देवीबद्दल अपार श्रद्धा, भक्ती आणि विश्वास असलेली कोणतीही व्यक्ती धोंड बनू शकते. एखादी मनीषा बाळगून किंवा स्वत:वरील संकट, अडचण दूर व्हावी अशी आंगवण करून धोंड बनता येते. आंगवण न करता धोंड बनता येत नाही आणि केलेली आंगवण देवीने पूर्ण केली नाही, असे कधी होत नाही, अशी ख्याती असल्यामुळेच दरवर्षी धोंडगणांची संख्या वाढत असते. म्हणूनच या पुऊषांसोबतच महिला आणि मुलेही धोंड बनून देवीचे व्रत आचरत असतात. काही घराण्यांमध्ये तर संपूर्ण कुटुंब हे व्रत करतात तर काही कुटुंबांमध्ये वडिलांनंतर पुत्र, अशा परंपरेने धोंडव्रत आचरण्यात येत असते.

असे हे व्रत करणारे धोंडगण प्रत्यक्ष जत्रेच्या दिवशी शिरगावात प्रवेश करतात तेव्हा त्यांचा पेहराव मनभावक असतो. कमरेपासून ढोपरापर्यंत घट्ट बांधून नेसलेले नवे करकरीत सोवळे आणि वर बनियान. पायात नवीन वहाण, गळ्यात मोगरीच्या कळ्यांच्या माळा आणि हाती विविधरंगी सुती गोंडे लावून सजविलेली बेतकाठी असा पुऊष धोंडाचा पेहराव असतो. महिलांच्या अंगावर नऊ वारी नवीन कापड, मानेवर मोकळे सोडलेले केस, गळ्यात शाल, मोगरी कळ्यांच्या माळा, नवीन वहाण, आणि हाती बेतकाठी असा पेहराव असतो.

या प्रत्येक धोंडासोबत त्यांच्या कुटुंबातील एक तरी सदस्य हा हमखास असतो. शिरगांवात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम ते देवीच्या (गावातील) मंदिरात जाऊन दर्शन, तीर्थप्रसाद घेतात. त्यानंतर देवीच्या तळीवर आंघोळ करतात. तेथून देवीचे आदिस्थान अर्थात मुर्डी येथील मूळ मंदिरात जातात. तेथे त्यांना विशेष कौल देण्यात येतो. हा कौल न घेता कोणताही धोंड अग्नीदिव्य करू शकत नाही. देवीने दिलेला कौल धोंडगण अग्नीदिव्य करेपर्यंत आपल्या तोंडात दाढेखाली धरून ठेवतात. त्यावेळी त्यांच्या अंगात एकप्रकारे दैवी शक्तीचा संचार होतो व ते भान हरपून निर्भय होऊन अग्नीदिव्य करतात.

एवढे कठोर व्रत आचरल्यानंतरही काही धोंडगणांकडून एखादी चूक घडून जाते. असे धोंड अग्नीदिव्यावेळी होमकुंडात पडतात किंवा त्यांच्या कपड्यांना आग वगैरे लागून भाजतात, असे मानले जाते. तरीही अशाप्रकारे भाजलेल्या किंवा जखमी झालेल्या धोंडगणास कोणत्याही वैद्य, डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात येत नाही. त्याला देवीच्या मंदिराजवळच असलेल्या अग्रशाळेत नेण्यात येते व तेथेच उपचार करून पूर्ण बरा झाल्यानंतर घरी पाठविण्यात येते. हासुद्धा देवीचा एक चमत्कारच मानण्यात येतो.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​