अर्जेंटिनात ‘एमएमए’ लढत जिंकणारा संग्राम सिंग ठरला पहिला भारतीय

वृत्तसंस्था / ब्युनोस आयर्स, अर्जेटिना : भारताचा एमएमए क्षेत्रातील दिग्गज खेळाडू संग्राम सिंग याने ब्युनोस आयर्स येथे इतिहास रचला असून अर्जेंटिनामध्ये एमएमए लढत जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ब्युनोस आयर्स येथील खचाखच भरलेल्या टिग्रे स्पोर्ट्स क्लब’ स्टेडियमवर आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या फ्रान्सच्या फ्लोरिअन कुडियर या लढवय्याला त्याने अवघ्या 1 मिनिट आणि 45 सेकंदांतच धूळ चारली.
तिबिलिसी (जॉर्जिया) आणि अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथील विजयानंतर, एमएमएमध्ये त्याने विजयाची हॅट्ट्रिकही पूर्ण केली. या लढतीत त्याला कुस्तीच्या तंत्रांचा मोठा फायदा झाला. दोन वेळा राष्ट्रकुल हेविवेट विजेता ठरलेल्या संग्राम सिंगने विजयानंतर म्हटले की, हार-जीत माझ्यासाठी महत्त्वाची नाही. मी एक तर जिंकतो किंवा शिकतो. मी अनेकदा म्हणतो की, जिद्दीला किंवा आवडीला वयाचे बंधन नसते. जसे आपले पंतप्रधान नेहमी म्हणतातत, मोठी स्वप्ने पाहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी कामाला लागा. जेव्हा मी अर्जेंटिनामध्ये ही लढत जिंकली, तेव्हा ‘पहिला भारतीय’ ठरण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरले.
त्याने आयोजकांचे तसेच गेल्या 25 वर्षांपासून आपल्यासोबत असलेल्या प्रशिक्षक भूपेश यांचेही आभार मानले. त्याला यशस्वी करण्यासाठी भूपेश यांनीही अहोरात्र मेहनत घेतली. संग्रामने सांगितले की, या विजयानंतर त्याला भारत आणि परदेशातून अभिनंदनाचे असंख्य संदेश प्राप्त झाले. या यशासाठी त्याने आपल्या प्रशिक्षकासोबत दिवसभर कठोर सराव केला, भरपूर घाम गाळला. दिवसभरात तो केवळ अर्धा ग्लास पाणी पिऊन राहिला. संग्राम सिंग 83 किलो वजनी गटात लढण्यासाठी उतरला होता. या गटात वजनामध्ये दोन किलोची सवलत उपलब्ध असते. संग्रामने आपली तिसरी एमएमए लढतही सहजपणे जिंकली होती. त्याने पाकिस्तानी लढवय्याला अवघ्या 90 सेकंदांत पराभूत केले होते.
Source link



