समाज परिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही

ग्रामीण भागातील मराठा-कानडी माध्यमांच्या शाळांमध्ये जागृती करण्यासाठी मान्यता
बेळगाव : समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. परंतु आजही तालुक्यातील असंख्य प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. दुर्गम भागातील अवस्था अधिकच बिकट आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे सातवीनंतर बहुसंख्य मुलींना शाळा सोडावी लागते हे वास्तव आहे. यासाठी गरज आहे ती समाजाने पुढे येऊन या सुविधा उपलब्ध करून देण्याची. ही गरज ओळखून विविध शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही व स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अमूल्य बुंद फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक आरती भंडारे यांनी. याची सुरुवात झाली ती कचरा व्यवस्थापन जनजागृतीच्या माध्यमातून. त्या स्वत: ठिकठिकाणी प्रामुख्याने शाळांमधून कचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती याबाबत सातत्याने मार्गदर्शन करतात.
75 शाळांमध्ये राबविला उपक्रम
शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल शिंदे यांची भेट घेतली व आपला उपक्रमाचा तपशील त्यांना सादर केला. सीईओनी सर्व कागदपत्रे व विश्वासार्हता पडताळल्यानंतर ग्रामीण भागातील मराठी व कानडी माध्यमांच्या शाळांमध्ये जागृती करण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार तालुक्यातील विविध क्लस्टरमधील 75 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षिसे
स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचे प्रकार व त्याचे दुष्परिणाम, प्लास्टिक जाळल्याने होणारे धोके व मासिक पाळी याबाबत जनजागृती करणे हा मूळ हेतू होता. मुख्य म्हणजे प्रश्नोत्तराचे सत्र केल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आणि अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसेही दिल्याने त्यांचा उत्साह व सहभाग वाढला. टाकाऊ कापडापासून तयार केलेल्या पिशव्या व बॅगपॅक, पुनर्वापरीत कागदांच्या बियाणे, पेन्सिल, कॅरीबॅग, स्टेशनरी पाऊच, स्टीलचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीसाठीचे आवश्यक साहित्य संस्थेने स्वखर्चाने दिले. याच दरम्यान अनेक शाळांमध्ये सुविधांची कतरता असल्याचे पुढे आले.
बहुतेक शाळांचे उत्तम सहकार्य
आरती भंडारे म्हणतात, बहुतेक शाळांनी उत्तम सहकार्य केले. काही शाळा सुरुवातीला साशंक होत्या. परंतु नंतर हा उपक्रम पूर्णत्वाला गेला. अमूल्य बुंदतर्फे बिजगर्णी, अतिवाड, बंबरगे व गोजगे या गावातील शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधून देण्यात आले. तर तुरमुरी, हिंडलगा, धरनट्टी व कर्ले येथील शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आले.
शाळांचा विकास उद्दिष्ट ठेवल्यास परिवर्तन शक्य
आरती यांच्या मते, एक संस्था आमुलाग्र परिवर्तन घडवू शकत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांनी शाळांचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवले तर शाळांमध्ये परिवर्तन होईल आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने शाळा सोडण्याची वेळ, अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांवर येणार नाही. सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह या प्राथमिक सुविधा कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध होतील याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. संस्थेने जरी स्वखर्चाने ही जबाबदारी पेलली असली तरी मर्यादा आहेतच. सर्व शाळांमध्ये विनामूल्य स्वरुपात प्रदूषण टाळून पर्यावरण या विषयावर जनजागृती करत आहोत. त्यामुळे अधिकाधिक निधी जर उपलब्ध झाला तर सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देणे सुकर ठरेल, असे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल शिंदे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असल्याने यावर्षीसुद्धा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शाळांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
Source link



