राजस्थान रॉयल्सचा विजयी चौकार

आरसीबीवर 6 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर वैभव सूर्यवंशीची तुफानी फटकेबाजी : ध्रुव जुरेलचीही नाबाद 81
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने खेळलेली तुफानी खेळी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. सूर्यवंशीने (26 चेंडूत 78) तुफानी अर्धशतक झळकावताना आरसीबीच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुलाई केली. त्याच्या या वादळी खेळीमुळे राजस्थानने आव्हानाचा पाठलाग सहज पार केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत चौथा विजय नोंदवत 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, गतविजेत्या आरसीबीला या हंगामातील पहिल्याच पराभवाचा धक्का बसला.
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल 8 चेंडूत 13 धावा करून परतला. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सची जोडी अवघ्या 21 धावांवर फुटली. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा चौकार-षटकारांसह आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश केला. 15 चेंडूत अर्धशतक झळकावल्यावर त्याने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने 17 चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. दुसरे अर्धशतक शतकामध्ये रुपांतरित करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. वैभवने 26 चेंडूत 300 च्या स्ट्राईक रेटने 78 धावांची खेळी केली. वैभव बाद झाल्यानंतर हेटमायर आणि कर्णधार रियान पराग स्वस्तात बाद झाले. यानंतर मात्र ध्रुव जुरेलने 43 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 81 धावांची खेळी साकारत संघाला 18 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. त्याला जडेजाने नाबाद 24 धावा करत चांगली साथ दिली. या जोरावर राजस्थानने विजयी लक्ष्य 18 षटकांत पूर्ण केले.
आरसीबीचा पहिला पराभव
प्रारंभी, राजस्थानने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि सामन्यातील पहिल्याच चेंडूवर आर्चरने फिल सॉल्टला झेलबाद केले. राजस्थानच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पॉवरप्लेमध्येच 3 विकेट्स घेतले. विराट कोहली 16 चेंडूत 32 धावा करत बाद झाला तर देवदत्त पडिक्कलही 14 धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने 40 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 63 धावांची उत्कृष्ट खेळी करत त्याने संघाचा डाव सावरला. याशिवाय रोमारियो शेफर्डने 22 धावांचे योगदान दिले. संघाने झटपट विकेट्स गमावल्याने वेंकटेश अय्यरला या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. वेंकटेश अय्यरने 15 चेंडूत 2 षटकार व एका चौकारासह नाबाद 29 धावा फटकावत संघाला 201 धावांपर्यंत नेले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकांत 8 बाद 201 (विराट कोहली 16 चेंडूत 32, पडिक्कल 14, रजत पाटीदार 40 चेंडूत 63, टीम डेविड 13, रोमारियो शेफर्ड 22, वेंकटेश अय्यर नाबाद 29, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा प्रत्येकी 2 बळी).
राजस्थान रॉयल्स 18 षटकांत 4 बाद 202 (यशस्वी जैस्वाल 13, वैभव सूर्यवंशी 26 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारासह 78, ध्रुव जुरेल 43 चेंडूत नाबाद 81, रवींद्र जडेजा नाबाद 24, हेटमायर 0, रियान पराग 3, हॅझलवुड आणि कृणाल पांड्या प्रत्येकी 2 बळी).
वैभवचे 15 चेंडूत अर्धशतक
वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला आणि त्याने आपल्या वादळी फटकेबाजीच्या बळावर 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमात वैभवने आता आयपीएलमध्ये संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद आयपीएल अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये केकेआरविरुद्ध अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. केएल राहुल दुसऱ्या स्थानावर (14 चेंडू) आहे.
Source link

