राजस्थानचा मुंबईला दणका

जैस्वाल-सूर्यवंशी जोरदार फटकेबाजी, राजस्थानचा भेदक मारा, मुंबई 27 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था, गुवाहाटी
यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशी यांची तुफान फटकेबाजी आणि नांद्रे बर्गर, संदीप शर्मा व रवी बिश्नोई यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पावसाचा अडथळा आलेल्या आयपीएलमधील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव करीत तिसरा विजय नोंदवला. गुणतक्त्यात त्यांनी 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. 32 चेंडूत नाबाद 77 धावा झोडपणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा बहुमान मिळाला.
पावसामुळे उशिरा सुरू झालेला हा सामना 11 षटकांचा करण्यात आला होता. मुंबईकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर राजस्थान रॉयल्सने जैस्वाल व सूर्यवंशी यांच्या फटकेबाजीमुळे 11 षटकांत 3 बाद 150 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईला अचूक मारा करीत 11 षटकांत 9 बाद 123 धावांवर रोखत सलग तिसरा विजय नोंदवला. जैस्वालने 32 चेंडूत 10 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 77 धावा फटकावल्या तर त्याचा साथीदार वंडरबॉय वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 1 चौकार, 5 षटकारांच्या साह्याने 39 धावा झोडपल्या. या दोघांनी केवळ 5 षटकांत 80 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत दोघांनी मिळून 9 षटकारांची आतषबाजी केली. ध्रुव जुरेल 2 धावा करून बाद झाल्यानंतर कर्णधार रियान परागने 10 चेंडूत 20 धावा फटकावल्या. हेटमायर 6 धावांवर नाबाद राहिला. मुंबईच्या गझनफरने 21 धावांत 2 तर शार्दुल ठाकुरने सूर्यवंशीचा एकमेव बळी मिळविला.
या सामन्यात सूर्यवंशी बुमराहला कसे सामोरे जातो, याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते. त्याने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सुरुवात केली. हाच जोम त्याने बाद होईंपर्यंत कायम ठेवला होता. जैस्वालने 23 चेंडूत 17 वे अर्धशतक पूर्ण केले आणि या खेळीत त्याने आयपीएलमधील षटकारांचे शतक पूर्ण केले.
षटकास 13 हून अधिक धावांच्या गतीने धावा करण्याची गरज असल्याने मुंबईवर बरेच दडपण आले आणि सलामीवीर रिकेल्टन पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर मुंबईला त्यातून सावरता आले नाही. फटकेबाजी करण्याच्या नादात अचूक गोलंदाजीमुळे त्यांचे बळी ठरावीक अंतराने बाद झाले आणि 11 षटकांत त्यांना 9 बाद 123 धावांची मजल मारता आली. नमन धीर (13 चेंडूत 25) व शेरफेन रुदरफोर्ड (8 चेंडूत 25) आणि तिलक वर्मा (10 चेंडूत 14) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. बर्गर, बिश्नोई, संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर आर्चर व तुषार देशपांडे यांनी एकेक बळी टिपला. या मोसमात विजयाने सुरुवात करणाऱ्या मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे.
Source link


