बारावी परीक्षेचा निकाल 86.48 टक्के

राज्याच्या परीक्षा निकालात प्रथमच 13.03 टक्क्यांची वाढ
बेंगळूर : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार 9 रोजी जाहीर झाला. संपूर्ण राज्याभरातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 86.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या म्हणजेच 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये निकालात 13.03 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच यंदा बारावी परीक्षेचा निकाल सर्वाधिक लागला आहे. मंगळूर जिल्ह्यातील मुडबिद्री येथील अल्वास पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा आणि बेंगळूरच्या जैन कॉलेजची विद्यार्थिनी अदिती ए. बापू यांनी 600 पैकी 600 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यात 28 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत 1,217 केंद्रांवर बारावी परीक्षा-1 पार पडली होती. गुरुवारी दुपारी 3 वाजता बेंगळूरमधील सार्वजनिक शिक्षण खात्याच्या कार्यालयात शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी पत्रकार परिषदेत परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालात उडुपी जिल्हा अव्वल ठरला असून या जिल्ह्याने 96.39 टक्के निकालासह राज्यात प्रथम स्थाप पटकावले. त्यापाठोपाठ 96.35 टक्क्यांसह मंगळूर जिल्हा द्वितीय स्थानी, 92.34 टक्के निकालासह कोडगू जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. यादगिरी जिल्हा शेवटच्या स्थानी असून या जिल्ह्याचा निकाल 71.21 टक्के लागला आहे.
निकालात मुलीच आघाडीवर
2025-26 सालातील बारावी परीक्षेला 7,10,363 विद्यार्थी बसले होते. त्यातील 3,35,138 मुले आणि 3,31,359 मुली उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 83.65 टक्के आणि मुलींचे उत्तीर्ण प्रमाण 88.70 टक्के इतके आहे. निकालात यावेळी शहरी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 74.55 टक्के तर ग्रामीण विद्यार्थी उत्तीर्ण प्रमाण 69.33 टक्के आहे.
यंदा निकालात वृद्धी
2024 आणि 2025 च्या बारावी परीक्षेच्या निकालाशी तुलना केल्यास यावेळी उत्तम निकाल लागला आहे. 2024 मध्ये एकूण 6,98,478 विद्यार्थ्यांपैकी 6,81,079 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 5,52,690 जण उत्तीर्ण झाले होते. 2025 मध्ये परीक्षा दिलेल्या 6,37,805 विद्यार्थ्यांपैकी 4,68,439 जण उत्तीर्ण झाले होते. परीक्षेतील कडक नियम आणि वेबकास्टिंगमुळे निकालात घसरण दिसून आली. मात्र, यंदा परीक्षा पद्धतीतील आमुलाग्र बदलाचा परिणाम सकारात्मक दिसून आला आहे.
विशेष श्रेणीत 1,70,529 विद्यार्थी
विशेष श्रेणीत 1,70,529 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे 2,95,385 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 63,957 विद्यार्थी द्वितीय उत्तीर्ण झाले आहेत. 50 टक्क्यांपेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 16,827 इतकी आहे. यंदा सर्व विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 1,772 पर्यंत खाली आला आहे.
दिशाच्या कामगिरीमागील वेदनेची गोष्ट
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मंगळूर जिल्ह्यातील मुडबिद्री येथील अल्वास पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा हिने वाणिज्य शाखेतून 600 पैकी 600 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. 100 टक्के निकालासह उत्तीर्ण होण्यामागील तिचे यश थक्क करणारे आहे. मात्र, या कामगिरीमागील वेदनेची गोष्ट हृदय पिळवटून टाकणारी आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी दिशाच्या आईने पाठीवर थाप मारून “परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण हो““ असे सांगून शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, दिशाने परीक्षेत मिळविलेले यश बहुधा नियतीला मान्य नसावे. तिसरा पेपर संपवून घरी येण्यापूर्वीच तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. आईचा मृत्यूमुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, त्या दु:खातही दिशाच्या डोळ्यासमोर तिने आईला दिलेले वचन आणि स्वप्न उभे होते. आईला अंतिम निरोप दिल्यानंतर अश्रु पुसन, वेदना गिळत तिने उर्वरित पेपर दिले. अन् गुरुवारी परीक्षेच्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. दिशाने 600 पैकी 600 गुण मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. परंतु, दिशाचा आनंद साजरा करण्यासाठी तिची आईच सोबत नाही. दिशाची कामगिरी हे केवळ गुण नाहीत, तर तीव्र वेदनेवर मात करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.
विभागनिहाय उत्तीर्ण
- कला-72.86 टक्के
- वाणिज्य-88.04 टक्के
- विज्ञान-86.48 टक्के
राज्यात प्रथम आलेले विद्यार्थी
कला विभाग
- अर्चना डी. एम. – इंदू पीयू कॉलेज, कोट्टूर (598 गुण)
- संगीता – इंदू पीयू कॉलेज, कोट्टूर विजयनगर (598 गुण)
- श्रुती – एसएमव्हीजी पीयू कॉलेज, कलबुर्गी (598 गुण)
वाणिज्य विभाग
- दिशा – अल्वास कॉलेज, मुडबिद्री (600 गुण)
- अदिती ए. बापू – जैन कॉलेज, बेंगळूर (600 गुण)
विज्ञान विभाग
- प्रीन्सिल्ला कार्डोजा- लर्निंग सेंटर कॉलेज, मंगळूर (599 गुण)
Source link


