देशविकास साधताना सुरक्षेशी तडजोड नाही!

पंतप्रधान मोदींची केरळमध्ये गर्जना : काँग्रेससह डाव्या पक्षांच्या रणनीतीवर डागली तोफ
वृत्तसंस्था/ तिरुवल्ला
केरळ विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. आपले सरकार महिला सक्षमीकरण आणि देशाच्या विकासासाठी काम करत आहे, तर विरोधी पक्ष केवळ राजकारण खेळत आहे. आम्ही देशाचा विकास साधताना सुरक्षेशी संबंधित कोणतीही तडजोड करणार नाही, अशी गर्जना पंतप्रधानांनी केरळमधील प्रचारसभेत केली.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केरळमधील तिरुवल्ला येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेदरम्यान त्यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका केली. तसेच भाजपकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे फायदेही त्यांनी कथन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांचा महिलांना सर्वाधिक फायदा झाला आहे. प्रत्येक घरात शौचालय, जन धन खाती आणि महिलांच्या नावावर घरांचे वाटप यासह अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुद्रा कर्ज आणि ‘लखपती दीदी’ यांसारख्या मोहिमांमुळे मोठ्या संख्येने महिलांना रोजगार आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षणावर भाष्य
सरकारने लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण सुनिश्चित केले आहे. ‘नारी शक्ती वंदन कायद्या’वर 16 ते 18 एप्रिल दरम्यानच्या संसद अधिवेशनात पुढील चर्चा केली जाईल. महिला सक्षमीकरण आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सांगून, त्यांनी सर्व राजकीय पक्षांना या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
केरळसमोरील सर्वात मोठे आव्हान रोजगाराचे असल्यामुळे तरुण देश सोडून जात आहेत. राज्याने उद्योग, सेवा क्षेत्र आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भ्रष्टाचार आणि जातीय राजकारण केरळच्या विकासात अडथळा आणत आहेत आणि हे अडथळे दूर झाल्यावरच राज्याची प्रगती होईल, असेही मोदी म्हणाले.
पश्चिम आशिया मुद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, काही काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमुळे तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त की. आखाती देशांशी भारताचे चांगले संबंध असल्यामुळे तेथील भारतीय सध्या सुरक्षित आहेत. मात्र, सर्व पक्षांनी जबाबदारीने वक्तव्ये केली पाहिजेत, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. गोवा, केरळ आणि तामिळनाडू येथील अनेक खलाशी इराण आणि पश्चिम आशियाच्या इतर भागांमध्ये अडकले असून त्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असताना, काँग्रेस केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Source link



