Uncategorized

तालुक्याच्या पूर्व भागाला अवकाळी पावसाने झोडपले

वादळी वाऱ्याचाही तडाखा : सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, सुळेभावी, मुचंडी शिवारात पाणी

वार्ताहर/सांबरा

तालुक्याच्या पूर्व भागातील बाळेकुंद्री खुर्द परिसराला शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी तुंबले होते. पूर्व भागातील सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मावीनकट्टी, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, कलखांब, मुचंडी आदी गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. गेल्या दोन दिवसापासून या भागात उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक उष्म्याने त्रस्त झाले होते. शुक्रवारी झालेल्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हा पाऊस पूर्व मशागतीसाठी उपयुक्त असला तरी या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसानही झाले आहे.

घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान

बाळेकुंद्री : बाळेकुंद्री खुर्द परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात सांबरा, बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी भागात मुसळधार पाऊस झाला. बाळेकुंद्री गावात कलमेश्वर यात्रेनिमित्त गावातील देवदेवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच दर्शनासाठी निघालेले भाविक पावसातही चिंब भिजले.

दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. करडीगुद्दी व हुदली भागात अनेक घरांचे पत्रे उडाले असून कौलांचेही नुकसान झाले आहे. या भागात अनेक शिवारातील विद्युतखांब कोसळले असून पावसाचा जोरदार तडाखा या भागात बसला आहे. मारिहाळ, सुळेभावी, मोदगा भागात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत होते. गेल्या काही दिवसापासून सकाळपासूनच कडक ऊन व प्रचंड उखाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन आकाश ढगाळ झाले व सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

वादळी वारा-पावसाने आंबा पिकाचे नुकसान

मारिहाळ, सुळेभावी, करडीगुद्दी भागात अवकाळी मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित आहेत. सुळेभावी व मारिहाळ शिवारात पाणीच पाणी झाले होते. मात्र पावसाने मारीहाळ गावच्या आंबा बागायतदारांना देशोधडीला लावण्याची वेळ आली आहे. मारिहाळ येथे सुमारे दहा हजार एकर प्रदेशाचा आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बागायतदारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. जोराच्या वाऱ्यासह आंबा पिकाची मोठी हानी झाली असल्याचे येथील बागायतदारांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​