इमारतीवरून पडून गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब द्वारका नगरी परिसरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या रुबी खातून मुन्ना खान (20) मूळ रा. बिहार , सध्या रा. द्वारकानगरी सावंतवाडी यांचे काल शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उपचारासाठी मोटरसायकलने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. द्वारका नगरी बिरोडकर टेंब येथे एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी शुक्रवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास रूम मधील लाईट गेल्याने ट्यूबलाइट आणण्यासाठी चौथ्या मजल्यावर रुबी आणि तिचे पती गेले होते. त्या दरम्यान ट्यूबलाईट जोडत असताना अंधारात खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेचे नातेवाईक बिहारी येथून सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक दाखल झाले होते.
Source link



