आठ महिन्यांत फोंड्याच्या समस्या सोडवू !

फोंडा जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांचे आवाहन: भाजपा, काँग्रेसकडून जनतेचा भ्रमनिरास
फोंडा : फोंड्यातील पोटनिवडणुकीतून आम आदमी पक्षाला केवळ आठ महिन्यांसाठी संधी द्या, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या सर्व समस्या सोडवू, असे आवाहन आपचे केंद्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी फोंडा येथील जाहीर सभेत केले. आपचे उमेदवार गितेश नाईक यांच्या प्रचारार्थ येथील जुन्या बसस्थानकावर काल बुधवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी उमेदवार गितेश नाईक, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, बाणावलीचे आमदार वेंझी विएगश, वेळळीचे आमदार क्रूझ सिल्वा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात गेली चौदा वर्षे भाजपाचे सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार केवळ विकासाच्या घोषणा करते, पण प्रत्यक्षात किती विकास झाला ते फोंडा शहरातील आरोग्य समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचे ढिग आणि वाहतूक समस्या पाहिल्यानंतर कळते. गोव्यात आपचे दोन आमदार आहेत. हे दोन्ही आमदार आपल्या पगारातून जनतेला आरोग्य सेवा पुरवतात. आपच्या सरकारने यापूर्वी दिल्लीत मोफत वीज, चांगल्या शिक्षण सुविधा आणि मोहोल्ला क्लिनिक सारख्या योजना आम जनतेसाठी राबविल्या. पंजाबमध्येही सुशासन आणले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपचे सरकार निवडून आणा, हेच मॉडेल गोव्यात राबविण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.
केजरीवाल पुढे म्हणाले की…
- फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये संगनमत असून कुठलाही उमेदवार निवडून आला तरी त्याचा फायदा भाजपालाच होणार आहे.
- काँग्रेसचे उमेदवार भाजपाच ठरवत असते. काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येणारे नंतर भाजपात प्रवेश करतात, याबाबत जनतेने सावध व्हावे.
- कुडचडेत भाजपाच्या नगरसेवकाचा मुलगा अल्वयीन मुलींचे शोषण करतो. त्याच्यावर गुन्हा नोंदवू नये, यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला जातो.
- सरकार जनतेचे काही ऐकत नाही. म्हणून आंदोलने करावी लागतात. जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हाच कारवाई होते, निर्णय बदलले जातात.
- कुडचडेतील पिडीत मुलींना सहानुभूती व न्याय मिळावा यासाठी भाजपाचा एकही कार्यकर्ता पुढे आला नाही.
फोंड्यातील मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांना आपण भेटी दिल्या. तपोभूमीवर जाऊन ब्रह्मेशानंद स्वामीजींचे आशिर्वाद घेतले. या भेटी दरम्यान गोवा हे एक चांगले अध्यात्मिक पर्यटन केंद्र होऊ शकते. येथील शांतता, सलोखा आणि निसर्ग सौंदर्य अबाधीत राखण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोवेकरांनी आपला संधी देऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तर बाणावलीतून लढणार नाही : वेंझी विएगश
आमदार वेंझी म्हणाले, आप हा फोंड्यातील मतदारांपुढे समर्थ पर्याय असल्याचे सांगितले. गितेश नाईक यांना निवडून दिल्यास येत्या सहा महिन्यात फोंड्यात मोहोल्ला क्लिनिक उघडून मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जातील. आपकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यास बाणावलीतून आपण पुढील निवडणूक लढणार नाही, असे जाहीर आवाहन केले. भाजपाने आजवर खोट्या आश्वासनावरच निवडणुका जिंकल्या. अच्छे दिन तर दूरच येथे एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल मिळवतानाही सामान्य जनतेची मारामार सुऊ आहे. आमदार क्रूझ सिल्वा यांनी भ्रष्टाचारमुक्त शासन, चांगल्या आरोग्य व शिक्षण सुविधा देण्यास आप बांधील असल्याचे सांगितले. त्यासाठी येणाऱ्या 2027 मध्ये परिवर्तनाची नांदी फोंड्याच्या पोटनिवडणुकीतून करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाल्मिकी नाईक यांनी भाजपा आणि काँग्रेसकडून मतदारांची फसवणूक चालल्याचा आरोप केला. आपला संधी दिल्यास पुढील सहा महिन्यांत फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळासह सहा मुख्य समस्या सोडविण्याचे आवाहन केले. उमेदवार गितेश नाईक यांनी आपण एका सामान्य कुटुंबातील तऊण उमेदवार असून आम जनतेची खरी सेवा आपच कऊ शकतो. भाजपा व अन्य पक्षांमध्ये सामान्यांना स्थान नाही. कुटुंबशाही पुढे नेण्याचे राजकारणा हे पक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडून दिल्यास फोंड्यातील आयडी इस्पितळासह, फोंडा मार्केट व अन्य समस्या सहा महिन्यात सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. इतर नेत्यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तेलेकर देसाई यांनी तर अॅड. सुरेल तिळवे यांनी आभार मानले.
Source link


